आदम अलैहिस्सलाम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आदम अलैहिस्सलाम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ५ डिसेंबर, २०२१

आदम अलैहिस्सलाम आणि एक अहंकारी

✔️📗2:30 ३०. आणि जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने फरिश्त्यांना फर्माविले की मी धरतीवर एक खलीफा (असा समूह जो एकमेकांनंतर येईल) बनवीत आहे. तेव्हा (फरिश्ते) म्हणाले, काय तू धरतीवर अशा लोकांना निर्माण करशील, जे तिच्यावर फसाद आणि रक्तपात करतील आणि आम्ही तुझ्या स्तुती-प्रशंसेसह तुझे गुणगान आणि तुझी पवित्रता वर्णन करतो. त्याने फर्माविले, जे मी जाणतो तुम्ही नाही जाणत. 

2:31 ३१. आणि त्या (अल्लाह) ने आदमला सर्व नावे शिकवून त्या चीज वस्तूंना फरिश्त्यांसमोर प्रस्तुत केले आणि फर्माविले, तुम्ही सच्चे असाल तर या चीज वस्तुंची नावे सांगा.  

2:32 ३२. फरिश्ते म्हणाले, हे अल्लाह! तू तर पवित्र (दोष- व्यंग नसलेला) आहे. आम्हाला तर तेवढेच ज्ञान आहे, जेवढे तू आम्हाला शिकविले आहे परिपूर्ण ज्ञान आणि बुद्धी कुशलता राखणारा केवळ तूच आहे. 

2:33 ३३. सर्वश्रेष्ठ अल्लाहने आदमला फर्माविले, तुम्ही यांची नावे सांगा. जेव्हा त्यांनी ती नावे सांगितली तेव्हा फर्माविले, काय मी तुम्हाला सांगितले नव्हते की मी आकाशांच्या आणि धरतीच्या अदृश्य गोष्टी जाणतो आणि जे तुम्ही करता किंवा लपविता तेही जाणतो. 

2:34 ३४. आणि जेव्हा आम्ही फरिश्त्यांना फर्माविले की आदमला सजदा करा. तेव्हा इब्लीसशिवाय सर्वांनी सजदा केला. त्याने इन्कार केला आणि घमेंड दाखविली  आणि तो काफिरां (इन्कारी लोकां) पैकीच होता. 

2:35 ३५. आणि आम्ही फर्माविले हे आदम! तुम्ही आणि तुमची पत्नी जन्नतमध्ये राहा आणि जिथून इच्छा होईल तिथून वाटेल तेवढे खा व प्या. परंतु या झाडाच्या जवळ जाऊ नका, अन्यथा अत्याचारी ठराल. 

2:36 ३६. परंतु सैताानाने त्यांना बहकवून तिथून बाहेर घालविलेच आणि आम्ही सांगून टाकले की उतरा येथून (जा, चालते व्हा), तुम्ही एकमेकांचे शत्रू आहात आणि एक ठराविक वेळेपर्यंत तुम्हाला धरतीवर राहायचे आणि लाभ घ्यायचे आहे. 

 2:37 ३७. आदमने आपल्या पालनकर्त्याकडून काही वचने शिकून घेतली (आणि अल्लाहजवळ क्षमायाचना केली). अल्लाहने त्यांची तौबा (क्षमायाचना) कबूल केली. निःसंशय तोच तौबा कबूल करणारा, दया करणारा आहे. 

 2:38 ३८. आम्ही फर्माविले, तुम्ही सर्व येथून उतरा, मग जर तुमच्याजवळ माझ्याकडून मार्गदर्शन आले तर जो कोणी माझ्या उचित मार्गाचा स्वीकार करील त्यांच्यावर कसलेही भय राहणार नाही, ना ते दुःखी होतील. 

 2:39 ३९. आणि जे कुप्र (इन्कार) आणि असत्याद्वारे आमच्या आयतींना खोटे ठरवतील ते जहन्नममध्ये राहणारे आहेत. नेहमी त्यातच राहतील.
(Qur'an 2:30-39)
==================================

 4:1 १. हे लोकांनो! आपल्या त्या पालनकर्त्याचे भय राखा, ज्याने तुम्हाला एकाच जीवापासून निर्माण केले आणि त्याच्यापासूनच त्याच्या पत्नीलाही निर्माण केले, आणि त्या दोघांपासून अनेक स्त्री-पुरुष पसरविले आणि त्या अल्लाहचे भय राखा, ज्याच्या नावाने तुम्ही एकमेकांकडे याचना करतात आणि नाते-संबंध तोडण्यापासूनही (स्वतःला वाचवा) निःसंशय, अल्लाह तुम्हा सर्वांची देखरेख करणारा आहे. 
(Qur'an 4:1)
==================================

✔️📗7:11 ११. आणि आम्ही तुम्हाला निर्माण केले, मग तुमचे रूप घडविले, मग आम्ही फरिश्त्यांना फर्माविले की आदमला सजदा करा, तेव्हा इब्लिसला सोडून सर्वांनी सजदा केला कारण तो सजदा करणाऱ्यांमध्ये सामील झाला नाही. 

 7:12 १२. (अल्लाहने) फर्माविले, जेव्हा मी तुला सजदा करण्याचा आदेश दिला, तेव्हा कोणत्या कारणाने तुला सजदा करण्यापासून रोखले. तो म्हणाला, मी याच्यापेक्षा अधिक चांगला आहे. तू मला आगीपासून निर्माण केले आणि याला मातीपासून निर्माण केले आहे. 

 7:13 १३. (अल्लाहने) आदेश दिला की तू आकाशातून खाली उतर, आकाशात राहून घमेंड करण्याचा तुला काहीच हक्क नाही. तेव्हा चल निघ. निःसंशय तू धिःक्कारलेल्यांपैकी आहेस. 

 7:14 १४. (सैतान) म्हणाला, मला (कयामतपर्यंत) संधी प्रदान कर, जेव्हा लोक दुसऱ्यांदा जिवंत केले जातील. 

 7:15 १५. (अल्लाहने) फर्माविले, तुला ती संधी प्रदान केली गेली. 

 7:16 १६. (सैतान) म्हणाला, तू मला धिःक्कारल्यामुळे मी त्यांच्यासाठी तुझ्या सरळ मार्गावर बसेन. 

 7:17 १७. मग त्यांच्या समोरून आणि पाठीमागून आणि उजव्या व डाव्या बाजूने हल्ला करीन आणि तुला यांच्यात अधिकांश लोक कृतज्ञशील आढळणार नाहीत.  

 7:18 १८. (अल्लाहने) फर्माविले, तू यापासून (येथून) अपमानित होऊन निघून जा जे त्यांच्यापैकी तुझ्या मार्गावर चालतील तर मी तुम्हा सर्वांनी जहन्नमला भरून टाकीन. 

 7:19 १९. आणि (आम्ही फर्माविले की) हे आदम! तुम्ही आणि तुमची पत्नी जन्नतमध्ये राहा, मग जिथून इच्छा होईल तिथून खा, आणि त्या झाडाच्या जवळ जाऊ नका अन्यथा अत्याचारी ठराल. 

 7:20 २०. मग सैतानाने दोघांच्या मनात कुविचार निर्माण केला, यासाठी की दोघांच्या वर त्यांची लज्जास्थाने उघड करावीत आणि सांगितले की तुम्हा दोघांच्या पालनकर्त्याने तुम्हाला या झाडापासून अशासाठी रोखले आहे की तुम्ही दोघे फरिश्ते व्हाल किंवा सदैवकाळ राहणारे व्हाल. 

 7:21 २१. त्याने (सैतानाने) त्या दोघांच्या समोर शपथ घेतली की, मी तुम्हा दोघांचा शुभचिंतक आहे. 

 7:22 २२. अशा प्रकारे धोकेबाजीने दोघांना खाली आणले, मग त्या दोघांनी झाडाचा स्वाद घेताच, दोघांवर त्यांची गुप्तांगे उघड झाली आणि ते आपल्यावर जन्नतची पाने चिकटवू लागले, आणि त्यांच्या पालनकर्त्या (अल्लाह) ने दोघांना पुकारले की काय मी तुम्हा दोघांना या झाडापासून रोखले नव्हते? आणि तुम्हाला सांगितले नव्हते की सैतान तुमचा खुला शत्रू आहे. 

 7:23 २३. दोघे म्हणाले, हे आमच्या पालनकर्त्या! आम्ही स्वतःवर जुलून करून घेतला आणि जर तू आम्हाला माफ केले नाही आणि आमच्यावर दया केली नाही तर आम्ही नुकसान उचलणाऱ्यांपैकी होऊ. 

 7:24 २४. (अल्लाहने) फर्माविले, तुम्ही खाली उतरा. तुम्ही आपसात वैरी आहात आणि तुम्हाला एक अवधीपर्यंत धरतीत राहावयाचे आणि लाभ प्राप्त करून घ्यायचे आहे. 

7:25 २५. फर्माविले की तुम्ही त्यातच जीवन व्यतीत कराल आणि त्यातच मरण पावाल आणि त्यातूनच बाहेर काढले जाल. 

7:26 २६. हे आदमच्या पुत्रांनो! आम्ही तुम्हाला असे वस्त्र प्रदान केले जे तुमच्या लज्जास्थानांना झाकेल आणि शोभा देईल आणि सर्वांत उत्तम वस्त्र, अल्लाहच्या भयाचे वस्त्र आहे. ही अल्लाहची निशाणी आहे यासाठी की यांनी स्मरण राखावे. 

 7:27 २७. हे आदमच्या पुत्रांनो! तुम्हाला सैतानाने बहकवून न द्यावे, जसे तुमच्या माता-पित्याला जन्नतमधून बाहेर घालिवले. त्याने त्यांचे वस्त्र उतरवून दिले, यासाठी की त्यांना त्यांची गुप्तांगे दाखवावीत. निःसंशय तो आणि त्याचे जातीबांधव तुम्हाला अशा ठिकाणाहून पाहतात की तुम्ही त्यांना पाहू शकत नाही. आम्ही सैतानांना अशा लोकांचे मित्र बनविले, जे ईमान (विश्वास) राखत नाही.
(Qur'an 7:11-27)
==================================

 ✔️📗7:189 १८९. तो (अल्लाह) असा आहे की ज्याने तुम्हाला फक्त एका जीवापासून निर्माण केले आणि त्याच्याद्वारे त्याची जोडी बनवली, यासाठी की त्याने आपल्या त्या जोडीदारापासून सुख चैन प्राप्त करावी, मग पतीने पत्नीशी जवळीक केली, तेव्हा तिला गर्भ राहिला हलकासा, मग ती त्याला घेऊन चालत फिरत राहिली. जेव्हा तिला भार जाणवू लागला, तेव्हा पती-पत्नी दोघे अल्लाहशी, जो त्यांचा स्वामी आहे, दुआ (प्रार्थना) करू लागले की जर तू आम्हाला सहीसलामत (व्यवस्थित स्वरूपात) संतान प्रदान केली तर आम्ही खूप खूप आभार मानू. (Qur'an 7:189)
==================================

✔️📗15:28 २८. आणि जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने फरिश्त्यांना फर्माविले की मी एक मानव, काळ्या सडलेल्या, खनकणाऱ्या मातीपासून निर्माण करणार आहे. 

15:29 २९. तर जेव्हा मी त्याला पूर्ण बनवून घेईन आणि त्यात आपला आत्मा फुंकेन तेव्हा तुम्ही सर्व त्याला सजदा करा (त्याच्यापुढे माथा टेका) 

15:30 ३०. यास्तव सर्वच्या सर्व फरिश्त्यांनी आपला माथा टेकला. 

15:31 ३१. परंतु इब्लिसने सजदा करणाऱ्यांमध्ये सामील होण्यास इन्कार केला. 

15:32 ३२. (अल्लाहने) फर्माविले, हे इब्लिस! तुला झाले तरी काय की तू सजदा करणाऱ्यांमध्ये सामील झाला नाही? 

15:33 ३३. तो म्हणाला, मी असा नाही की या मानवाला सजदा करावा, ज्याला तू काळ्या आणि सडलेल्या खणखणणाऱ्या मातीपासून निर्माण केले आहे. 

15:34 ३४. (अल्लाहने) फर्माविले, आता तू जन्नतमधून चालता हो कारण तू धिःक्कारलेला आहेस. 

15:35 ३५. आणि तुझ्यावर कयामतच्या दिवसापर्यंत माझ्यातर्फे धिःक्कार आहे. 

15:36 ३६. तो म्हणाला, हे माझ्या पालनकर्त्या! मला त्या दिवसापर्यंत संधी प्रदान कर की लोकांना दुसऱ्यांदा (जिवंत करून) उठविले जाईल. 

15:37 ३७. फर्माविले, (ठीक आहे) तू त्यांच्यापैकी आहेस, ज्यांना संधी दिली गेली आहे. 

15:38 ३८. ठरलेल्या दिवसाच्या वेळेपर्यंतची. 

15:39 ३९. (सैतान) म्हणाला, हे माझ्या पालनकर्त्या! तू मला मार्गभ्रष्ट केलेस तर मीदेखील शपथ घेतो की मी सुद्धा धरतीत त्यांच्यासाठी मोह माया निर्माण करीन आणि त्या सर्वांना बहकवून मार्गभ्रष्ट करीन. 

15:40 ४०. मात्र तुझ्या त्या दासांखेरीज, ज्यांना तू निवडून घेतले आहे. 

15:41 ४१. फर्माविले, हो. हाच माझ्यापर्यंत पोहचण्याचा सरळ मार्ग आहे. 
(Qur'an 15:28-41)
==================================

✔️📗17:61 ६१. आणि जेव्हा आम्ही फरिश्त्यांना आदेश दिला की आदमला सजदा करा, तेव्हा इब्लिसखेरीज सर्वांनी सजदा केला. तो म्हणाला, काय मी त्याला सजदा करू, ज्याला तू मातीपासून बनविले आहे. 

17:62 ६२. ठीक आहे, पण पाहा तू त्याला माझ्यावर श्रेष्ठता तर प्रदान केली आहे, परंतु जर तू मला कयामतपर्यंत संधी देशील तर मी याच्या संततीला, फार कमी लोकांशिवाय आपल्या काबूत करेन. 

17:63 ६३. (अल्लाहने) आदेश दिला, जा, त्यांच्यापैकी जो कोणी तुझा अनुयायी होईल तर तुम्हा सर्वांची शिक्षा जहन्नम आहे, जो पुरेपूर मोबदला आहे. 

17:64 ६४. त्यांच्यापैकी तू ज्याला देखील आपल्या बोलण्याने बहकवू शकशील बहकव आणि त्यांच्यावर आपले स्वार आणि प्यादे चढवून आण, आणि त्यांच्या धन आणि संततीमधून आपलाही हिस्सा लाव, आणि त्यांना (खोटे) वचन दे. त्यांच्याशी जेवढी देखील वचने (वायदे) सैतानाचे असतात, सर्वच्या सर्व पूर्ण दगाबाजी आहे. 

17:65 ६५. माझ्या सच्चा दासांवर तुझा कोणताही प्रभाव आणि काबू नाही आणि तुमचा पालनकर्ता मोठा काम बनविणारा पुरेसा आहे. 
(Qur'an 17:61-65)
==================================

✔️📗18:50 ५०. आणि जेव्हा आम्ही फरिश्त्यांना आदेश दिला की आदमच्या पुढे सजदा करा, तेव्हा इब्लिस (सैताना) खेरीज सर्वांनी सजदा केला तो जिन्नांपैकी होता. त्याने आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाची अवज्ञा केली. काय तरीही तुम्ही त्याला आणि त्याच्या संततीला, मला सोडून आपला मित्र बनवित आहात? वास्तविक तो तुम्हा सर्वांचा शत्रू आहे. अशा जुलमी लोकांचा किती वाईट मोबदला आहे.
(Qur'an 18:50)
==================================

✔️📗20:115 ११५. आणि आम्ही आदमला अगोदरच ताकीदपूर्ण आदेश दिला होता, परंतु त्यांना त्याचा विसर पडला आणि आम्हाला त्यांच्यात कोणताही दृढनिश्चय आढळला नाही. 

20:116 ११६. आणि जेव्हा आम्ही फरिश्त्यांना सांगितले की आदमला सजदा करा तेव्हा इब्लिसखेरीज सर्वांनी सजदा केला, त्याने साफ इन्कार केला. 

20:117 ११७. तेव्हा आम्ही सांगितले, हे आदम! हा तुमचा आणि तुमच्या पत्नीचा शत्रु आहे (लक्षात ठेवा) असे न व्हावे की त्याने तुम्हा दोघांना जन्नतमधून बाहेर घालवावे, ज्यामुळे तुम्ही संकटात सापडावे. 

20:118 ११८. इथे तर तुम्हाला ही सवलत आहे की ना तुम्ही उपाशी राहता, ना नग्न. 

20:119 ११९. आणि इथे ना तुम्ही तहानलेले राहता, ना उन्हाने त्रस्त राहता. 

20:120 १२०. परंतु सैतानाने आदमच्या मनात कुविचार टाकला, म्हणाला, हे आदम! काय मी तुम्हाला चिरस्थायी जीवनाचा वृक्ष आणि त्या राज्यसत्तेची खबर देऊ जी कधीही जुनी न व्हावी. 

20:121 १२१. यास्तव त्या दोघांनी त्या झाडातून काही खाल्ले, मग त्यांची गुप्तांगे उघडी झालीत आणि ते जन्नतची पाने आपल्या अंगावर चिकटवू लागले. आदमने आपल्या पालनकर्त्याची अवज्ञा केली आणि बहकले. 

20:122 १२२. मग त्यांच्या पालनकर्त्याने त्यांना उपकृत केले, आदमची तौबा कबूल केली आणि त्यांचे मार्गदर्शन केले. 

20:123 १२३. (अल्लाहने) फर्माविले, तुम्ही दोघेही इथून खाली उतरा. तुम्ही आपसात एकमेकांचे शत्रू आहात. आता तुमच्याजवळ जेव्हा कधीही माझ्याकडून मार्गदर्शन पोहचेल, तर जो कोणी माझ्या मार्गदर्शनाचे पालन करील तर तो न बहकेल, ना कष्ट- यातनाग्रस्त होईल.

20:124 १२४. आणि जो कोणी माझ्या स्मरणापासून तोंड फिरविल, त्याचे जीवन तंगी- अडचणीचे राहील आणि कयामतच्या दिवशी आम्ही त्याला आंधळा करून उठवू. 

20:125 १२५. (तो) म्हणेल, हे पालनकर्त्या! मला तू आंधळा बनवून का उठविले? वास्तविक मी चांगले बघू शकत होतो. 

20:126 १२६. उत्तर मिळेल, असेच व्हायला पाहिजे होते. तू माझ्या (तर्फे) आलेल्या आयातींचा विसर पाडला, तद्‌वतच आज तुझाही विसर पाडला जात आहे. 

20:127 १२७. आणि आम्ही असाच मोबदला प्रत्येक माणसाला देत असतो, जो मर्यादेचे उल्लंघन करील आणि आपल्या पालनकर्त्याच्या आयतींवर ईमान न राखेल आणि निःसंशय आखिरत (मरणोत्तर जीवना) चा अज़ाब मोठा सक्त आणि चिरस्थायी आहे. 
(Qur'an 20:115-127)
==================================

✔️📗38:71 ७१. जेव्हा तुमच्या पालनकर्त्या (अल्लाह) ने फरिश्त्यांना सांगितले, मी मातीपासून मानवाला निर्माण करणार आहे. 

38:72 ७२. तर जेव्हा मी त्याला यथायोग्य करीन आणि त्याच्यात आपला आत्मा फुंकीन, तेव्हा तुम्ही सर्व त्याच्यासमोर सजदा करा (माथा टेका) 

38:73 ७३. तेव्हा सर्व फरिश्त्यांनी सजदा केला.

38:74 ७४. परंतु इब्लिसने (केला नाही) त्याने घमेंड केली आणि तो इन्कार करणाऱ्यांपैकी होता. 

38:75 ७५. (अल्लाहने) फर्माविले की हे इब्लिस! त्याला (आदमला) सजदा करण्यापासून तुला कोणत्या गोष्टीने रोखले, ज्याला मी आपल्या हातांनी बनविले, काय तू गर्विष्ठ झाला आहेस की तू उच्च दर्जा राखणाऱ्यांपैकी आहेस? 

38:76 ७६. (त्याने) उत्तर दिले की मी याच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे, तू मला आगीपासून निर्माण केले आणि याला मातीपासून निर्माण केले. 

38:77 ७७. फर्माविले की तू येथून निघून जा, तू तिरस्कृत (धिःक्कारित) झाला. 

38:78 ७८. आणि कयामतच्या दिवसापर्यंत तुझा माझ्यातर्फे धिःक्कार आहे. 

38:79 ७९. तो म्हणाला, हे माझ्या स्वामी! मला त्या दिवसापर्यंत सवड प्रदान कर, जेव्हा लोक (जिवंत करून) उठविले जातील. 

38:80 ८०. (अल्लाहने) फर्माविले, तू सवड दिल्या जाणाऱ्यांपैकी आहेस. 

38:81 ८१. निर्धारित वेळेच्या दिवसापर्यंत . 

38:82 ८२. म्हणाला, मग तर तुझ्या प्रतिष्ठेची शपथ! मी या सर्वांना अवश्य भटकवीन. 

38:83 ८३. मात्र तुझ्या त्या दासांखेरीज, जे निवडक (आणि प्रिय, पवित्र) असतील. 

38:84 ८४. फर्माविले, सत्य हेच आहे आणि मी सत्यच सांगत असतो.

38:85 ८५. की मी तुझ्याद्वारे आणि तुझ्या सर्व अनुयायींद्वारे जहन्नमला भरून टाकेन. 
(Qur'an 38:71-85)
==================================
अनुवाद-  — Muhammad Shafi’i Ansari 

08. मूसा अ. आणि फिरौंन

मूसा अ. आणि फिरौंन  (*या सत्य कथे युसुफ अ. ची सत्यकथा वाचावी.) इजिप्तचे लोक, एक अल्लाह मध्ये विश्वास करत नव्हते…त्यामुळे ते, बनी इस्राइल च्...